जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
हे प्रगतीच्या क्रांतीसुर्या,
तुझ्या विचारांच्या क्रांतीचे किरणे इतक्या खोलवर पसरले आहेत की, व्यवस्थेच्या हजार पिढीच्या इतिहासात विषमतेवर मात करणारा योद्धा म्हणुन, तुझ्या शब्दांचा उजेड पाडणारा प्रत्येक किरण हा इथल्या मनुवादी व्यवस्थेला चटका देणारा असेल. कारण, तु केलेली या देशातील शैक्षणिक क्रांती आणि सामाजिक क्रांती इथल्या विषमतेत जखडून पडलेल्या मानवाच्या आस्तित्वाला न्याय देणारी ठरली. हे क्रांतीसुर्या, तुझ्या नियमांची आणि कृतीशीलतेची बिजे आज बोटावर मोजन्याइतपत लोकं पेरतांना दिसतात. जी माणसे आपले विचार पेरणारी या देशात जन्माला आलीत, तिचं माणसे आपले अस्तित्व टिकवून ठेवणारी आहेत. अन्यथा इतिहास पुसणारी जमात सुद्धा या देशात थैमान घालू पाहत आहे. परंतु, अजुनही त्या विचारशून्य माणसांना ठाऊक नाही, की *'विचार रोवणारी माणसे मरत नाहीत, जोपर्यंत तोच विचार पेरणारी माणसे जिवंत आहेत'.* तुम्ही कितीही आपटून क्रांतीचे विचार संपविण्याचा मनात सुड ठेवला तरी, ही कधीही न संपणारी परिवर्तनाची आग आहे, ही ठिणगीच्या स्वरूपात जिवंत राहून, वैचारिक परिवर्तन घडवून आणणारी क्रांतीची मशाल आहे. कारण इथल्या मानवतेच्या अस्तित्वासाठी आणि देशातील स्त्रियांच्या न्याय, हक्क, शिक्षणासाठी झटणारा तू बाप ठरला आहेस. सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी यशवंत मनोहर आपल्या कवितेत म्हणतात की, "अजुनही जाळ फुंकतो तो छातीत माझ्या, तु मेला तरीही मरणार नाही." अगदी तसाच या देशात तू समता पेरणारा बहुजनांचा क्रांतीनायक (आमचा बाप) होऊन गेलास. हे क्रांतीनायका तुझ्या त्या काळच्या व्यवस्थेत स्त्री शिक्षणापासून वंचित असलेल्या नारीचा शिल्पकार म्हणून आजही आधुनिकतेत तुझे नाव सुवर्ण अक्षराने कोरले आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमावर पोवाडा लिहून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला आदर्श पराक्रमी, चरित्र्यशील राजाचे उत्तम उदाहरण दाखविणारा तू महामेरू ठरलास, रायगडावर शिवरायांची समाधी शोधणारा उत्खननकर्ता म्हणून जन्मलास, शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा आणि *"शेतकऱ्यांचे असूड"* या पुस्तकाचे लेखन करून शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा तू शेतकऱ्यांचा लढवय्या नायक झालास, बालविवाह, केशवपन, विधवा पुनर्विवाह, अनाथ/अनौरस बालकांच्या संगोपनासाठी तत्कालीन काळात आपली पत्नी क्रांतीज्योती सावित्रीला शिक्षण देऊन भारतात स्त्रियांच्या शिक्षणासाठी तथाकथित व्यवस्थेच्या विरोधात अत्यंत विरोध पत्करून शिक्षणाचा पाया रचणारे तुम्ही शिक्षणमहर्षी झालात. या सर्व इतिहासाचा अभ्यास ज्या ज्या महापुरुषांनी केला. त्या महापुरुषांच्या यादीत फुल्यांना आपला गुरू मानणारे डॉ. बाबासाहेब हे एक महापुरुष आहेत. राष्ट्रपिता फुल्यांच्या क्रांतीची आणि डॉ. बाबासाहेबांच्या लेखणीची नाळ अगदी जवळचे नाते दर्शवीते. तेव्हाचं फुल्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीला बाबासाहेबांनी प्रेरणास्रोत मानले. भारतीय संविधान निर्माण करतांना, प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी धर्म, जात, भाषा, प्रांत, राज्य, देश, संप्रदाय, लिंग, वर्ण यावरून कोणताही भेदभाव न करता अधिकार बहाल केले. काही कर्तव्याचे पालन करण्यास देखील तेवढ्याच ताकदीने बजावले आहे. स्वतःचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी इतरांच्या स्वातंत्र्याचा सन्मान राखने. आणि सर्व बाबतीत सहिष्णू असणे गरजेचे आहे. आपल्या देशात जे धर्माच्या बाबतीत असहिष्णुतेचे वातावरण बघायला मिळते. ते इथल्या संविधानिक नितीमत्तेला आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनांनी ग्रासले आहे. आज २१ व्या शतकातला जगातला विज्ञानवादी माणुस इतका असहिष्णू वागत असतांना आपण खरचं संविधानिक आणि सहिष्णू देशाचे नागरिक आहोत का असा प्रश्न जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा, १९ व्या शतकातील महात्मा फुले धर्माच्या बाबतीत इतका जगावेगळा विचार देतात तेव्हा खऱ्या अर्थाने आजच्या परिस्थितीत फुल्यांची ही *धार्मिक सहिष्णुता* समजून घेणे गरजेचे वाटते. म्हणूनच या असहिष्णू भारतात क्रांतिसूर्य फुल्यांची आणि डॉ. बाबासाहेबांची सहिष्णुता आणि विचार कसा टिकवून ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
बादलराज..
9403179484