समाजातल्या वंचितांची एकत्र मोट बांधून त्यांचं सरकार आणण्याचं स्वप्न डॉ. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवलं होतं. त्यासाठी समाजातल्या विविध घटकांना आणि त्या घटकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांना आणि पक्षांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडी नावाचा नवा प्रयोग देखील त्यांनी केला होता. मात्र, आता त्या प्रयोगाला झटके बसायला सुरुवात झाली आहे. ‘वंचित बहुजन आघाडीमध्ये आता विश्वासार्हता संपली आहे, त्यामुळे आम्ही आमच्या पदांचा राजीनामा देत आहोत’, असं म्हणत वंचित बहुजन आघाडी/भारिप बहुजन महासंघातल्या तब्बल ४७ पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. हा वंचित बहुजन आघाडीला आणि खुद्द प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का मानला जात आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये अनेक माजी आमदार, राज्य पातळीवरचे पदाधिकारी, जिल्हा पातळीवरचे पदाधिकारी, जिल्हा परिषदा-पंचायत समितीवरील माजी सभापती, उपाध्यक्ष, संघटक, सचिव, कार्याध्यक्ष अशा विविध पदांवरील व्यक्तींचा समावेश आहे.
प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका, पक्षाच्या ४७ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे!
• Kapil Sorate