पालघरला त्या रात्री नक्की काय घडलं,सर्वाधिक विश्वासार्ह माहिती:

पालघर/प्रतिनिधी


डहाणूच्या गडचिंचले गावाजवळ दोन साधूंची त्यांच्या चालकासह जमावाने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना निश्चितपणे माणसातल्या अविचारी, हिंस्र पशूचे दर्शन घडवून गेली.
या साधूंच्या गुरूचे सुरत येथे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी हे दोघे साधू इको गाडीने नाशिकहून सिल्व्हासामार्गे निघाले होते. लॉकडाऊन असल्याने नेहमीच्या रस्त्याने न जाता त्यांनी जंगलातला आडवळणी मार्ग निवडला होता. गडचिंचले परिसरात चोर दरोडेखोरांचा वावर असून ते मुले पळवत आहेत, अशा अफवा गेल्या आठवडाभरापासून पसरल्या होत्या. त्यामुळे या गावातील आदिवासींची गस्त चालू होती. ही भयंकर घटना घडण्यापूर्वी २ दिवस आधी विश्वास वळवी नावाच्या डॉक्टरच्या गाडीवर जमावाने हल्ला केला होता.  नशीब बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून कसाबसे बचावले. 
गुरूवारी रात्री नाशिकहून निघालेले हे साधूआपल्या गाडीतून  या गावाजवळ पोहोचले तेव्हा गस्तीवरच्या जमावाने त्यांना घेरले. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. कोयते, काठ्या, मोठ्या दंडुक्यांसह  अंगावर आलेल्या जमावामुळे घाबरलेल्या साधूंना नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे, अधिक संशयाने जमावाने त्यांना मारहाण सुरु केली. त्यातील एक ७० वर्षांचा साधू त्याही परिस्थितीत गाडीबाहेर पडून मदतीसाठी याचना करत जवळच असलेल्या वनखात्याच्या चौकीजवळ गेला. तेथे एकच कर्मचारी उपस्थित होता. या साधूने त्याच्याकडे मदत मागितली. पण तोपर्यंत जमाव तेथे पोहोचला. या जमावासमोर हा वन खात्याचा कर्मचारी काही करु शकला नाही. या हैवानरुपी जमावाने साधूला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या दोन सहकाऱ्यांची जमावाने आधीच हत्या केली होती. 
यादरम्यान त्या वनकर्मचाऱ्याने पोलिसांना फोन करून घटनेची कल्पना दिली. गडचिंचलेपासून काही अंतरावर असलेल्या कासा येथील पोलीस चौकीवर असलेले ६  पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यावरही या जमावाने हल्ला चढवला. त्यात ५ कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर ५०० पोलिसांचा फौजफाटा या गावात पोहोचला. त्यांनी १०१ आरोपीना अटक करून गाव सील केले.
आता हा घटनाक्रम लक्षात घेतला, की पोलिसांनी साधूला जमावाच्या हवाली केले अशी तद्दन खोटी माहिती पसरवली गेली हे स्पष्ट होते. वास्तविक मारहाणीच्या  व्हायरल झालेल्या व्हिडिओत साधूसोबत दिसणारा कर्मचारी हा वनखात्याचा होता. तो पोलीस नव्हता. त्याच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते. आपला जीव वाचवण्याकडे त्याचा कल होता, हेच या व्हिडिओत स्पष्ट दिसते.
तरीही पोलिसांवर या घटनेचे खापर फोडून जो थयथयाट सुरू झाला आहे, तो राजकारणाचाच एक भाग आहे.
अनेक चॅनेलनीही ;विशेषतः हिंदी चॅनेलनी  या घटनेच्या मुळाशी न जाता चिथावणीखोरांना पूरक ठरतील अशा बातम्या चालवण्यास सुरुवात केली आहे. या हत्याकांडाचे समर्थन होऊच शकत नाही. मात्र याआडून जे भडकावणारे वातावरण निर्माण केले जातेय ते निश्चितच निंदनीय आणि चिंताजनक आहे.