कमी संक्रमित जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी येत्या दोन दिवसात कार्ययोजना सादर करणार- उद्योगमंत्री देसाई

मुंबई/प्रतिनिधी


राज्यातील कोरोनाची लागण, संक्रमण नाही किंवा  कमी आहे अशा जिल्ह्यात उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग कार्ययोजना तयार करीत असून येत्या दोन दिवसात ही कार्ययोजना सादर करण्यात येऊन लवकरच उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या 15 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील डिक्कीच्या सदस्यांना संबोधित करतांना बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमाने आज राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचेशी आज डिक्कीच्या सर्व जिल्यातील सदस्य व पदाधिकारी अशी अनौपचारिक चर्चा पार पडली. यावेळी डिक्की चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, डिक्की वेस्ट इंडियाचे बँकिंग प्रमुख विजय सोमकुवर,  डिक्की महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष कांबळे, डिक्की मुंबईचे अध्यक्ष अरुण धनेश्वर, डिक्की विदर्भचे अध्यक्ष गोपाल वासनिक, मराठवाडा चे अध्यक्ष मनोज आदमने, मुंबईचे उपाध्यक्ष पंकज साळवे यांचेसह 100 डिक्की उद्योजक व त्यांचे सहकारी असे 500 जण सहभागी झाले होते. यावेळी लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांना कोरोनाच्या संकटामुळे येणाऱ्या अडचणी डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, निश्चय शेळके, संतोष कांबळे व पंकज साळवे आदींनी विषद केल्या. यात प्रामुख्याने उद्योगाना या संकटामुळे खेळते भांडवलाची कमतरता, आरबीआयने बँकांना तीन महिने इएमआय भरण्यास अवधी दिला असला तरी त्यावर चक्रवाढ व्याज आकारण्यात येणार आहे त्यामुळे व्यावसायिक पुन्हा अडचणीत येणार आहे,  त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लघु उद्योजक विशेष प्रोत्साहन योजना, स्टँडअप इंडीया योजने अंतर्गत 15 टक्के मार्जिन मनी अनुदान आदींशी संबधित विषय उद्योगमंत्री यांचेकडे मांडण्यात आले. या सर्व विषयांवर सर्व संबंधितांची बैठक बोलाविण्यात येऊन तोडगा काढन्यात येईल तसेच या संकटावर मात करण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग लवकरच कृती आराखडा निर्माण करीत व सर्व उद्योजकांच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन उद्योगमंत्री यांनी दिले. डिक्की पदाधिकारी व सदस्यांनी दिलेल्या विविध नाविन्यपूर्ण कल्पनांचे त्यांनी स्वागत केले व त्या अंमलात आणणार असल्याचेही सांगितले.