नरेंद्र मोदी-डोनाल्ड ट्रंप भेट: पाहुण्यांना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहतीये भिंत

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांची पत्नी मेलॅनिया ट्रंप भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.


ट्रंप 24 आणि 25 फेब्रुवारी हे दोन दिवस भारतात असणार आहेत. या दोन दिवसात ते दिल्ली आणि अहमदाबादचा दौरा करतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेत जेवढा भव्य स्वागत सोहळा झाला होता, त्याच धर्तीवर ट्रंप यांच्याही स्वागताची तयारी सुरू आहे. अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये 'हाउडी मोदी' कार्यक्रम झाला होता. तसाच अहमदाबादमध्ये 'केम छो ट्रंप' कार्यक्रम आखण्यात येतोय. गुजराती भाषेत 'केम छो ट्रंप' म्हणजे 'तुम्ही कसे आहात ट्रंप?'







या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप भारतीयांना संबोधित करणार असल्याचं कळतं. यावेळी ट्रंप यांच्यासोबत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा असणार आहेत.






मात्र, अहमदाबादमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर एक झोपडपट्टी येते. ही झोपडपट्टी लपवण्यासाठी एक भिंत उभारण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांकडून याला विरोध होतोय. ही झोपडपट्टी अहमदाबाद एअरपोर्टहून साबरमती आश्रमाच्या मार्गावर आहे.

स्थानिक जनता मात्र सरकारच्या या निर्णयावर नाराज आहे त्यांचा भिंत उभारण्याला विरोध आहे.


झोपडपट्टी लपवण्यासाठी भिंत


गुजरातमधल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये गुरुवारी ही बातमी प्रसिद्ध झाली की ट्रम्प यांच्या मार्गातली एक झोपडपट्टी लपवण्यासाठी सहा ते सात फूट उंच भिंत उभारण्यात येत आहे. ही भिंत जवळपास अर्धा किमी लांब आहे.


अहमदाबाद शहरातल्या इंदिरा ब्रिज लगतच्या सरणियावास भागातून राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा ताफा जाणार आहे. या झोपडपट्टीत जवळपास अडीच हजार लोक राहतात.



सरकार गरिबी लपवू इच्छिते. झोपडपट्टी दिसू नये, असं सरकारला वाटत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. सरकारला झोपडपट्टी नको असेल तर ते सरकारी खर्चातून पक्की घरं का बांधून देत नाही.