ह्याला म्हणतात खरे मेरीट - Srinivasa Gowda: उसेन बोल्टला आव्हान देतोय चक्क म्हशींबरोबर पळून...

धावायला सुरुवात करून डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत शर्यत जिंकणारा उसेन बोल्ट जगभरात प्रसिद्ध आहे. बोल्टच्या वेगमैफलीला आव्हान देईल असा धावलिया भारतात असेल तर! कर्नाटकमधले श्रीनिवास गौडा या धावपटूला भारताचा बोल्ट अशी बिरुदावली मिळाली आहे. त्याला कारणही तसंच आहे.


कर्नाटकमध्ये कंबाला शर्यत आयोजित केली जाते. बैलांच्या किंवा म्हशींच्या जोडीबरोबर धावायचं असतं. बांधकाम कामगार म्हणून काम करणाऱ्या श्रीनिवासन यांनी 142 मीटरचं अंतर अवघ्या 13.42 सेकंदात पूर्ण केल्याचं समजतं. ही शर्यत शेतात होते. 100 मीटर शर्यतीचा जागतिक विक्रम बोल्टच्या नावावर असून त्याने 9.58 सेकंदात हे अंतर कापलं होतं. श्रीनिवास यांनी बोल्टच्या आकडेवारीला साधर्म्य राखेल अशा वेळेत शर्यत पूर्ण केल्याने त्याला भारताचा बोल्ट अशी बिरुदावली मिळाली आहे.


दरम्यान श्रीनिवास यांच्या कामगिरीची बोल्टची तुलना करू नये असं कंबाला शर्यतीच्या आयोजकांनी म्हटलं आहे. ऑलिम्पिक इव्हेंट मॉनिटर्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये धावपटूंच्या वेळेची नोंद ठेवणारी यंत्रणा अत्यंत शास्त्रोक्त आणि अत्याधुनिक असते. त्यामुळे श्रीनिवास आणि बोल्ट यांची तुलना करण्याच मोह टाळावा असं कंबाला अकादमीचे अध्यक्ष के.गुणपला कंदाबा यांनी म्हटलं आहे.


स्थानिक वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांनी श्रीनिवास याला थेट बोल्टची उपमा देत त्याचं कौतुक केलं होतं.


पिळदार शरीरयष्टीचे श्रीनिवास दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूदाबिद्रीचे आहेत. माझ्याइतकंच दोन म्हशींची भूमिका महत्त्वाची असल्याचं श्रीनिवास यांनी सांगितलं.


गेली सात वर्ष कंबाला शर्यतीत सहभागी होत असल्याचं श्रीनिवास यांनी सांगितलं.